ठाणे, दि. 7 (जिमाका) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दहीहंडीनिमित्त ठाणे शहरातील विविध दहीहंडी मंडळांना भेटी देऊन गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून स्थापन करण्यात आलेल्या टेंभीनाका मित्र मंडळाच्या दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहून गोविंदांशी संवाद साधला. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रित सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने आयोजित संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवास आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी महोत्सवालाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तेथे उपस्थित गोविंदांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, माजी नगरसेविका परीषा सरनाईक, खास स्पेनमधून आलेले केसलर्स, सुशांत शेलार आदी उपस्थित होते.
नवी मुंबईतील सुनील चौघुले स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव कार्यक्रमासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट दिली. यावेळी माजी आमदार विजय चौघुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या वतीने यंदापासून प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध दहीहंडी पथकात सहभागी गोविंदांचा विमा काढला असून गोविंदांचा अपघात झाल्यास आर्थिक मदत देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.