‘जैविक इंडिया ॲवार्ड’ ने कृषी विभाग सन्मानित

पुणे, दि.११ : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागास राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा “जैविक इंडिया ॲवार्ड २०२३” नवी दिल्ली येथे नुकताच प्रदान करण्यात आला. कृषी विभागाच्यावतीने आत्माचे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी पुरस्कार स्विकारला. हा पुरस्कार कृषी विभागांतर्गत “डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” या राज्य पुरस्कृत योजनेमध्ये सेंद्रिय शेती आणि कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष कार्याबद्दल देण्यात आला, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

“डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” कार्यक्षेत्र विस्तारून संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आले असून योजनेचा कालावधी  २०२७-२८ पर्यंत वाढविण्यात आला आहे. योजनेअंतर्गत तीन वर्षात राज्यात  १३ लाख हेक्टर नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखाली आणावयाचे आहे. समूह  संकल्पनेद्वारे १८ हजार ८२० उत्पादक गट व १ हजार ८२५ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन्याचे उद्दिष्ट्य ठरविण्यात आले आहे. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जैवनिविष्ठा संसाधन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

विदर्भातील आत्महत्याग्रस्त, नैराश्यग्रस्त अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा या ६ जिल्ह्यात २०१८-१९ पासून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत ९ हजार २६८ शेतकऱ्यांचे १५ हजार ६८२ हे. क्षेत्र  सेंद्रिय प्रमाणिकरणाखाली आणण्यात आले आहे. योजनेअंतर्गत २० हे. क्षेत्राचे ४३५ गट स्थापन करण्यात आले असून त्या गटांच्या ४० शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्यांचा महासंघ स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे एकूण रु. २ कोटी ८२ लाख भागभांडवल जमा झाले आहे. योजनेअंतर्गत १२ किरकोळ विक्री केंद्र, १७ समूह संकलन केंद्र, महासंघ ऑरगॅनिक मिशन नावाचा ब्रँड तयार करण्यात आला असून सदर ब्रँडच्या नावाने सेंद्रिय शेतमालाची विक्री करण्यात येते.

नैसर्गिक व सेंद्रिय शेती योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हास्तरावर प्रकल्प संचालक, आत्मा यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आत्माचे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी केले आहे.

0000