उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात सामंजस्य करार

0
4

मुंबई, दि. १२ : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि संवाद कौशल्याच्या दृष्टीने उपयुक्त इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवन शैली अभ्यासक्रम महाविद्यालयात शिकविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवन शैली (English Communication, Values and Life Skills) या अभ्यासक्रमासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात सामंजस्य करार झाला.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर आणि  इन्फोसिस उन्नती फाऊंडेशन, बंगळूरचे रमेश स्वामी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, इन्फोसिसचे मुख्य अधिकारी संतोष अंतपुरा उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये व विकास याबाबींवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. एसजीबीएस उन्नती फाऊंडेशन बंगळूर या संस्थेमार्फत तयार करण्यात आलेला १६५ तासांचा इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवन शैली (English Communication, Values and Life Skills) या विषयातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळविण्याकरिता आवश्यक कौशल्य प्रत्यक्ष वर्गात शिकविले जाणार आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असेल, असेही मंत्री. श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांनी ९० टक्के उपस्थितीसह अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्यांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत हा अभ्यासक्रम कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, व नागालॅण्ड या राज्यांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तेलंगणा, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये तो सुरू होणार आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here