निराधार मुलांच्या संगोपनासाठी ‘तर्पण’ संस्थेबरोबर सामंजस्य करार – केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी

मुंबई, दि. 12 : काही मुले वेगवेगळ्या कारणांमुळे आपले आई- वडील गमावतात व निराधार होतात. अशा मुलांना अनाथ म्हणणे अयोग्य आहे. या मुलांचे आपण सर्व जण पालक आहोत. या संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार होण्याच्या दृष्टीने निराधार मुलांच्या संगोपनासाठी केंद्रीय महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘तर्पण’ संस्थेबरोबर सामंजस्य करार करण्यात येईल, असे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज सकाळी ‘तर्पण’ संस्थेच्यावतीने प्रतिभा सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती इराणी बोलत होत्या. यावेळी ‘ऑॅर्फन रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ॲकॅडमी सेंटरचे’ केंद्रीय मंत्री श्रीमती इराणी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात उद्घाटन करण्यात आले. निराधार मुलांना मोबाईल, लॅपटॉपचे वाटपही यावेळी करण्यात आले. यावेळी तर्पण संस्थेचे अध्यक्ष, आमदार श्रीकांत भारतीय, श्रेया भारतीय यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या की, निराधार मुलांचे जीवन जगणे हा एक संघर्ष असतो. हा संघर्ष ‘तर्पण’ सारख्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था सुसह्य करतात, ही बाब कौतुकास्पद आहे. सामाजिक क्षेत्रात स्वयंसेवी संस्था उत्कृष्ट कार्य करीत आहेत. त्यापैकीच एक ‘तर्पण’ संस्था आहे. या संस्थेचे कार्य अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे. या संस्थेची शाखा राजधानी नवी दिल्लीत कार्यान्वित करावी. असेही त्यांनी सांगितले. उपस्थित मुलांना त्यांनी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजाला सशक्त करण्यासाठी व सशक्त भारत निर्माण करण्यासाठी सृजनात्मक कार्य, योगदान देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी  यावेळी  सांगितले .

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील, ‘तर्पण’ संस्थेचे अध्यक्ष श्री. भारतीय यांनी मनोगत व्यक्त केले.

००००

प्रविण भुरके/ससं/