पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘आयटो’चे अधिवेशन महत्वपूर्ण ठरेल – प्रधान सचिव राधिका रस्तोगी

मुंबई, दि. 12 : इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयटो) , केंद्र शासनाचा पर्यटन विभाग व पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्ममाने २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आयटीसी हॉटेल रामा इंटरनॅशनल औरंगाबाद  येथे ३८ व्या ‘आयटो’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटन मंत्री गिरीष महाजन उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांनी दिली.

कफ परेड येथील हॉटेल ताज प्रेसिडेन्ट येथे ‘आयटो’ परिषदेबद्दल माहिती देण्यासाठी पर्यटन विभाग व ‘आयटो’मार्फत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती रस्तोगी बोलत होत्या. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ‘आयटो’चे अध्यक्ष राजीव मेहरा, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, ‘आयटो’चे मानद सचिव संजय रजझदान,’आयटो’ उपाध्यक्ष रजनीश कैस्था यासह आयटोचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

श्रीमती रस्तोगी म्हणाल्या की, महाराष्ट्र हे या परिषदेचे यजमानपद भूषवित असून तीन दिवस चालणा-या या परिषदेच्या माध्यमातून राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनाची बलस्थाने पर्यटन क्षेत्रातील  विविध घटकांना समजावून सांगता येतील. महाराष्ट्र राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटन स्थळांची माहिती देखील ‘आयटो’च्या माध्यमातून विविध घटकांपर्यत जाईल. या परिषदेत विविध मार्गदर्शपर व्याख्यानांचे आयोजन केले आहे, यामध्ये हॉटेल्स आणि टूर ऑपरेटर्स यांच्यातील समन्वय : काळाची गरज, तंत्रज्ञानाचा बदलणारा चेहरा : क्रूझ पर्यटन, नदी पर्यटन आणि  सागरी किनारी पर्यटन, महाराष्ट्रातील पर्यटन संधी आणि आव्हाने, औरंगाबादमधील पर्यटनाच्या संधी या विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली आहेत. या माध्यमातून विविध पर्यटन क्षेत्रातील सहभागीधारकांना पर्यटनवाढीसाठी नक्कीच लाभ होईल.

‘आयटो’चे अध्यक्ष श्री. मेहरा म्हणाले की, ‘आंतरराज्य पर्यटन आणि नाविन्यपूर्ण शाश्वत पर्यटन’ ही या ‘आयटो’ची थीम असून तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात  ‘इंडिया ट्रॅव्हल मार्ट’ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. देशभरातून ९०० ते १००० एवढे पर्यटनाशी निगडित संस्थेचे भागधारक उपस्थित राहणार आहेत. परिषदेत सहभागी राज्यांना त्यांच्या पर्यटन स्थळांची  माहिती व पर्यटन व्यवसायिकांशी परस्पर संवाद (Interaction) साधण्यास संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या परिषदेत सहभागी राज्यांना निःशुल्क स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयएटीओ) ही भारताची टूर ऑपरेटर्सची राष्ट्रीय सर्वोच्च संस्था आहे ज्याचे देशभरातील सदस्यत्व आहे. या संस्थेच्या सदस्यामध्ये देशाचे इनबाउंड टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, हॉटेल चेन, एअरलाइन्स, टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, ट्रॅव्हल प्रेस आणि मीडिया, पर्यटन शैक्षणिक संस्था आणि राज्य सरकारचे पर्यटन विभाग व राज्य पर्यटन विकास महामंडळे यांचा समावेश आहे. आयटो चे वार्षिक अधिवेशन हे भारतीय पर्यटन दिनदर्शिकेतील सर्वात महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी एक मानले जाते.

श्री. मेहरा यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे दर्शन घडवण्यासाठी टूरचे आयोजन प्रतिनिधींसाठी करण्यात आले आहे. त्यात अजिंठा आणि वेरूळ लेणी, शिर्डी, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, लोणार सरोवर, शनी शिंगणापूर मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, सुशील मंदिर आदींचा समावेश असेल. 1 ऑक्टोबर रोजी आयटो रन फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम आयोजित करणार आहोत.

यावेळी पर्यटन संचालक डॉ. पाटील व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी यांनी महाराष्ट्र राज्यातील पर्यटनास संधी असल्याची माहिती यावेळी दिली.

0000

संध्या गरवारे/विसंअ