तरुणांना कौशल्यविषयक शिक्षण देऊन रोजगारक्षम बनवावे-राज्यपाल रमेश बैस

पुणे, दि.१२: तरुणांना विविध भाषा शिकवितानाच रोजगारक्षम बनविण्यासाठी त्यांना सर्वोत्तम कौशल्य विषयक शिक्षण देण्याची गरज आहे. कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी होण्यासह त्यांचा जीवनस्तर उंचावेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारक समितीच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या ‘पुनरुत्थान गुरुकुलम्’च्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह मिलिंद देशपांडे, सचिव सतीश गोरडे उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बैस म्हणाले, भारत सर्वाधिक तरुणांची संख्या असलेला देश आहे. तरुण कुशल मनुष्यबळाचा अभाव असलेले देश मनुष्यबळाच्या पूर्ततेसाठी भारताकडे आशेने पाहत आहेत. भारतासाठी ही सुवर्णसंधी असून त्यासाठी आपल्या युवा लोकसंख्येला कौशल्याचे शिक्षण उपयुक्त ठरेल.

स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असलेल्या आदिवासी बांधवांनी येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करण्यात पुढाकार घेतला होता. आदिवासी जमातींच्या हक्कांना राज्यघटनेद्वारे संरक्षित करण्यात आले आहे. या समाजाला शिक्षीत करुन त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही श्री. बैस म्हणाले.

‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्’च्या माध्यमातून आदिवासी समाजातील मुलांना संगणक, मूर्तीकला, मातीची भांडी तयार करण्याचे शिक्षण देणे आणि महिला सबलीकरण आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या विकासासाठी करण्यात येत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. श्री.प्रभुणे गेल्या पाच दशकापासून आदिवासी समाजासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुलम् पारधी समाजाच्या ३५० मुलांची देखभाल करत आहे. गुरुकुलम् ला सर्वप्रकारची मदत करण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी सुमारे ४१ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे असे सांगितले.

गिरीश प्रभुणे यांनी गुरुकुलम् च्यावतीने करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करुन त्यानुसार गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना जन्मदाखला आणि आधार कार्ड मिळावे यासाठीच्या अडचणी सोडविल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधिश सोनल पाटील, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, सहायक धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुके, उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांचा प्रातिनिधीक स्वरुपात राज्यपाल महोदयांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी राज्यपाल श्री. बैस यांनी ‘गुरुकुलम्’ ला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

क्रांतितीर्थ’ वाड्याला राज्यपालांची भेट

राज्यपाल रमेश बैस यांनी चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या ‘क्रांतितीर्थ’ वाड्याला भेट देऊन उभारण्यात आलेले म्युरल्स, संरक्षित दगडी व लाकडी बांधकाम, ऐतिहासिक वस्तू, छायाचित्रे आदींची माहिती घेतली. येथील मूर्ती पाहून जीवंतपणाचा अनुभव येतो, असे ते म्हणाले.

०००