राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरण बिघडविण्याचे काम कोणी करू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३ : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून मराठा समाज बांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल असा खोडसाळपणा कुणी करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

घडलेले मुद्दे, प्रसंग आणि घटना मोडतोड करून सोशल मीडियावर फिरवले जात आहेत. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत असताना. या पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा आणि सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार योग्य नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर झालेल्या मुद्द्यांवर सकारात्मक बोलूया अशी चर्चा मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार करीत असताना आमचा संवाद ‘सोशल मीडिया’वरून चुकीच्या पद्धतीने संपादित करून फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली आणि सकारात्मक भूमिका घेतली असताना, संवादाचा मार्ग प्रशस्त केला असताना खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत.

शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. या पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा आणि सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या राज्याची ही संस्कृती नाही. राज्यात असलेले सकारात्मक वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आवाहन केले आहे.

००००