चंद्रपूर, दि. 13 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपीय वर्षात आपण भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त, समतायुक्त भारत घडविण्याचा संकल्प केला आहे. जनहित हेच सर्वतोपरी मानून शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. गरीबांच्या कल्याणासाठी या योजना असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीत चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
नियोजन भवन येथे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्राचे वितरण करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गौडा, तहसीलदार ज्योती कुचनकर, हरीष शर्मा, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष ब्रिजभुषण पाझारे, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, सुभाष कासनगोट्टूवार, अंजली घोटेकर, रवी गुरनुले, संध्या गुरुनुले, अजय सरकार, श्रीराम पानेरकर, प्रवीण उरकुडे, दिवाकर पुद्दटवार, मुद्गा खांडे, दिनेश पाझारे, प्रवीण उरकुडे, विलास टेंभूर्डे आदी उपस्थित होते.
गरिबांपर्यंत त्यांचे हक्क आणि अधिकार पोहचविण्यासाठी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष ब्रिजभुषण पाझारे आणि समितीच्या सर्व सदस्यांनी सेवाभावी वृत्तीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, मुंबईमध्ये कल्याणकारी योजना तयार होतात, मात्र समाजातील वंचित घटकापर्यंत त्या पोहचल्या पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. आपण आमदार असतांना निराधारांसाठी विधानसभेत आवाज उठविला होता. तर अर्थमंत्री झाल्यावर निराधारांसाठी असलेले 600 रुपयांचे अनुदान 1200 केले. तर यात पुन्हा वाढ करीत हे अनुदान आता 1500 रुपयांपर्यंत करण्यात आले आहे.
जनहित हेच सर्वतोपरी आहे. यासाठीच शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये 50 टक्के तिकीट सवलत दिली. बाजारभावापेक्षा कमी दराने राज्यातील 1 कोटी 62 लक्ष कुटुंबांना गणेशोत्सवात आपण आनंदाचा शिधा देत आहोत. गरीबांची सेवा हाच राज्य शासनाचा धर्म आहे. त्यासाठी विविध शिबिरांचे आयोजन करून गरीबांच्या घरांपर्यंत योजना पोहचविल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
प्रास्ताविकात ब्रिजभुषण पाझारे म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गरीब, निराधार, कॅन्सरपिडीत, दिव्यांग, परितक्त्या आदींचे काम करण्याची मला संधी दिली आहे. संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातून गत दोन महिन्यात 268 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. निराधारांना मिळणारे 1500 रुपयांचे मानधन पाच हजार रुपये करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते लता मांडवकर, गुलखान आलमखान पठाण, साबिरा बी पठाण, पल्लवी राजपुरोहित, गुणवंत दुर्योधन, प्रवीण दडमल, निशांत शेडमाके, अमन उईके, संदीप खोब्रागडे आदींना मंजूरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
०००