नंदुरबार : दि. 13 सप्टेंबर 2023 : (जिमाका वृत्तसेवा) – केंद्र सरकार व राज्य शासनाने हाती घेतलेल्या विविध ओरोग्याच्या सेवा पुरविणाऱ्या मोहिमेपैकी आयुष्मान भव हे एक अभियान असून जिल्ह्यातील यात दुर्गम तथा अतिदुर्गम भागातील, वाड्या-पाड्यातील शेवटची व्यक्तीही आरोग्याच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
ते आज जिल्हा सामान्य रूग्णालयात आयुष्मान भारत अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. सावन कुमार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना म्हणाले, या मोहिमेत 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘सेवा पंधरवड्या’ दरम्यान या अभियानाचे तीन मुख्य स्तंभ असतील, ज्यामध्ये जिल्ह्यातील आरोग्य आणि कल्याण केंद्रांवर आयुष्मान मेळा आयोजित केला जाईल. याशिवाय आयुष्मान कार्ड वितरणाची प्रक्रिया जलद केली जाईल आणि आयुष्मान बैठका आयोजित केल्या जातील. आरोग्याच्या क्षेत्रात आदर्श निर्माण करणारी गावेही आयुष्मान गाव म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या योजनांचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात येत आहे, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.
अशी आहे आयुष्मान भव अभियान
मोहिमेदरम्यान आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहिम, अयवयदान जागृती मोहिम, स्वच्छता मोहिम, वय वर्ष 18 वरील पुरूषांची आरोग्य तपासणी मोहिम उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान ‘आयुष्मान भवः’ सेवा पंधरवाडाही राबविण्यात येईल. ‘आयुष्मान आपल्या दारी’ अंतर्गत पात्र लाभार्थीचे आयुष्मान कार्ड नोंदणी व वितरण, स्वयं नोंदणीसाठी जनतेला प्रोत्साहित करणे, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचे संयुक्त कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. आयुष्मान सभेचे 2 ऑक्टोंबर रोजी ग्रामसभेच्या स्वरूपात आयोजन करण्यात येणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर आयुष्मान मेळाव्याचे आयोजन दर आठवड्याला शनिवारी करण्यात येणार आहे. मेळाव्यामध्ये पहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य आजार तपासणी, निदान व उपचार, दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्ठरोग व इतर असंसर्गजन्य आजार तपासणी, निदान व उपचार, तिसऱ्या आठवड्यात माता, बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा, चौथ्या आठवड्यात सिकलसेल तपासणी व नेत्र रोग चिकित्सा, कान, नाक व घसा तपासणी होईल. या सर्व मेळाव्यांदरम्यान 18 वर्ष व अधिक वयोगटातील पुरूषांची आरोग्यविषयक सर्वंकष तपासणी करण्यात येणार असून ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालय येथे दर आठवड्याला आरोग्य मेळावा पार पडणार आहे.
निक्षयमित्रांचा झाला सन्मान
प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व सेवाभावी संस्था यांच्यामार्फत क्षयरुग्णांना पोषण आहार दिला जातो. त्यांना ‘निक्षयमित्र’ संबोधले जाते. नंदुरबार जिल्ह्यात देखील सद्यस्थितीत 22 निक्षय मित्रांमार्फत एकूण 488 क्षयरूग्णांना पोषण आहार देण्यात येतो. त्यापैकी 4 निक्षयमित्रांचा यावेळी प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.
डॉ. संदीप बाळासाहेब पुंड
दिपाली गावित (याहामोगी मेडिकल, खांडबारा)
ख्रिश्चन मिशन हॉस्पिटल, चिंचपाडा
संकल्प बहुउद्देशीय संस्था