अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये कर्ज योजनेंतर्गत ४ कोटी रक्कम जमा – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, ‍‍दि. १४ : केंद्र शासनाकडून मुदत कर्ज योजनेअंतर्गत १६ कोटी रुपये निधी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास उपलब्ध झाला आहे. महामंडळास उपलब्ध झालेल्या १६ कोटी निधीपैकी आज  ४.०२  कोटी रुपये ऑनलाईन पद्धतीने अर्जदार व विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले असल्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, आज वितरीत करण्यात आलेल्या ४.०२ कोटी रकमेमधील मुदत कर्ज योजनेंतर्गत व्यवसायासाठी ८१ लाभार्थ्यांना २.३५ कोटी रुपये इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे व शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत १६७ विद्यार्थ्यांना १.६७ कोटी रुपये रक्कम वितरीत करण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत प्राप्त झालेला १६ कोटी निधी जलद गतीने अल्पसंख्याक समाजातील अर्जदार व विद्यार्थी यांना वितरीत करण्याबाबतच्या सूचना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांना मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी दिल्या.

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ हे राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवम वित्त निगम, नवी दिल्ली (एनएमडीएफसी) यांची राज्य वाहिनीकृत यंत्रणा म्हणून महाराष्ट्रात कार्यरत आहे. एनएमडीएफसी मार्फत कर्ज स्वरुपात प्राप्त होणाऱ्या निधीतून मुदत कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना या योजनांची अंमलबजावणी महामंडळामार्फत राज्यामध्ये करण्यात येते.

*****

शैलजा पाटील/विसंअ/