पायाभूत विकास कामांच्या उभारणीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण            

मुंबई, दि. 15 : राष्ट्राच्या प्रगतीत पायाभूत सुविधांची उपलब्धता अत्यावश्यक बाब आहे. या विकास कामांच्या उभारणीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्वपूर्ण योगदान आहे. या व्यापक जबाबदारीच्या जाणिवेने सर्वांनी गुणवत्तापूर्ण काम करत उत्कृष्टतेचा मानदंड प्रस्थापित करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिनी आयोजित “उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सन २०२१-२२ व २०२२-२३” कार्यक्रमात मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (बांधकामे) संजय दशपुते, सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, नागपूर सुधाकर सु. मुरादे, मुख्य वास्तूशास्त्रज्ञ अनिता खेरडे, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबईचे मुख्य अभियंता रणजित हांडे, मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, कोकण शरद राजभोज, मुख्य अभियंता, विद्युत सा.बां. प्रादेशिक विभाग संदीप पाटील यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, प्रत्येकाला चांगले काम करत प्रगती करण्याची संधी मिळत असते. त्या संधीचा योग्य उपयोग करुन स्वतःसोबतच आपल्या विभागाचा, राज्याचा, देशाचा नावलौकीक आपण वाढवू शकतो. पुरस्कार म्हणजे जबाबदारी असते. प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून देशाच्या अमृतकाळात नवीन कामाची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये सक्रिय सहभाग घेत या अमृतकाळाला अधिक चांगले करण्यात आपण सर्व आपल्या परीने निश्चितच हातभार लाऊ शकतो. काम करताना प्रत्येकाने आपल्याला जीवनगौरव पुरस्कार प्राप्त होईल, या विचारातून दर्जेदार काम करण्याची वृत्ती वाढीस लावावी.

रस्ते, पूल, इमारती कोणत्याही प्रकारचे काम करताना आपल्या विभागाला एक मानदंड प्रस्थापित करता येऊ शकतो. ज्या माध्यमातून आपल्या विभागाची सोबतच आपली प्रतिमा आपण उंचावू शकतो. उत्कृष्ट काम करत पुरस्कार मिळवलेल्या सर्व विजेत्यांच्या कामातून निश्चितच ही प्रेरणा निर्माण होत जाईल, अशा गुणवत्तापूर्ण कामाची परंपरा ते निर्माण करतील. सर्वांमध्ये क्षमता आहेत,कामाचा अनुभव आहे. त्याला योग्य न्याय देत मिशन मोडवर काम करावे. ते करत असताना आपले स्वास्थ,कामाची गुणवत्ता याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असे आवाहन  मंत्री श्री.चव्हाण यांनी केले.

अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर म्हणाल्या की, अभियांत्रिकी क्षेत्र प्रगत होत गेले. त्याप्रमाणे आपली संस्कृती प्रगत होत गेली आहे. अभियांत्रिकी हे सर्व संकल्पना, स्वप्नांना प्रत्यक्ष मूर्तस्वरुप देणारे क्षेत्र आहे. त्याच पद्धतीने आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला ही एक परंपरा आणि भारतरत्न विश्वेश्वरैय्या यांच्या सारख्या अभियंत्याचा वारसा लाभलेला आहे, या पार्श्भूमीवर प्रत्येकाने अधिक चांगले काम करण्याची आपली जबाबदारी यशस्वी पार पाडली पाहिजे.

यावेळी सार्वजनिक विभागामार्फत याच वर्षापासून देण्यात येणा-या पहिल्या जीवन गौरव पुरस्काराने संजय श्रीकृष्ण भोंगे, मुख्य अभियंता (स्वेच्छा निवृत्त) यांना गौरवण्यात आले. यावेळी सन २०२१-२२  मधील एकूण ४३, तर तसेच सन २०२२-२३ या वर्षातील ४१ जणांना उल्लेखनीय कामगिरीसाठी  मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संकल्पचित्र मंडळामार्फत तयार करण्यात आलेल्या नमुना संकल्पचित्र पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच नमुना संकल्पचित्र पुस्तिका तयार करणाऱ्या अभियंत्यांचा गौरव करण्यात आले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ येथे केलेल्या उत्कृष्ट कामांबद्दल अभियंत्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. साळुंखे यांनी केले. सचिव श्री.दशपुते यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन प्रमोद बनगोसावी, अधीक्षक अभियंता, मुंबई सा.बां. मंडळ, मुंबई यांनी मानले.

०००

वंदना थोरात/विसंअ