इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत नवीमुंबई महापालिकेचा विक्रम; एकाच वेळी १ लाख १४ हजार विद्यार्थी व नागरिक सहभागी

0
6

नवी मुंबई, दि.18 : ‘इंडियन स्वच्छता लीग’ कार्यक्रमा अंतर्गत नवीमुंबई महापालिका क्षेत्रात 1 लाख 14 हजारहून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी एकात्मता आणि स्वच्छता विषयक शपथ घेण्याचा विक्रम केला आहे.

गतवर्षी नवीमुंबई महानगर पालिकेला देशात प्रथम क्रमांकाचे नामांकन मिळाले होते. हे नामांकण कायम रहावे यासाठी नवीमुंबई महानगरपालिका आयुक्ता तथा प्रशासक श्री.राजेश नार्वेकर यांनी शहरातील विविध भागात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या उपक्रमस्थळी उपस्थित राहून उपस्थितांचा उत्साह वाढविला. याठिकाणी आयुक्तांसमवेत सर्व उपस्थितांनी स्वच्छता शपथ सामुहिकरित्या घेतली. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईकरांचा उत्साह बघून भारावून गेलो असल्याची भावना व्यक्त केली. नवी मुंबईकर विद्यार्थी, युवक, नागरिक, लोकप्रतिनिधी यांची स्वच्छतेविषयीची ही जागरूकता व शहराविषयीचे प्रेमच नवी मुंबईला कायम नंबर वनवर ठेवेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

शहरात विविध विभागांमध्ये 9 ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय काही स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या भागात स्वच्छता मोहीमा राबवून त्याठिकाणीही स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली.

पाच ठिकाणी खाडीकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तेथेही उपस्थितांनी स्वच्छता शपथ घेतली. आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी त्याठिकाणी उपस्थित राहून खारफुटी स्वच्छतेत सहभागी झालेल्या जागरूक नागरिकांना प्रोत्साहित केले. यामध्ये 10 हजार 500 हून अधिक नागरिक स्वयंस्फु्र्तीने सहभागी झाले होते. त्यातही युवकांची व विशेषत्वाने युवतींची संख्या लक्षणीय होती.

लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या माध्यमातून रिचा समित यांच्या पुढाकाराने वाशी विभागात 235 तृतीयपंथी नागरिकांनी एकत्र येत स्वच्छतेविषयी अभिनव पध्दतीने जनजागृती केली.

स्वच्छ व सुंदर शहर अशी ओळख असणा-या नवी मुंबईकर विद्यार्थी, नागरिकांची स्वच्छतेविषयी असलेली जागरूकता आणि शहराविषयी असणारे प्रेम यांचे दर्शन घडविणारा हा भव्यतम उपक्रम नवी मुंबईला स्वच्छतेच्या धाग्याने जोडणारा व शहरात स्वच्छतेची चळवळ निर्माण करणारा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here