शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबर उस उत्पादनावर भर द्यावा – पालकमंत्री संजय राठोड

0
8

यवतमाळ, दि. २१ (जिमाका) : शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबर उस या नगदी पीक उत्पादनावर भर द्यावा, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

दारव्हा तालुक्यातील मुंगसाजी नगर, बोदेगाव येथे शेतकऱ्यांसाठी कृषि प्रदर्शनी, शेतकरी मेळावा आणि उस पीक परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री श्री.राठोड बोलत होते. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, कृषिरत्न डॉ.संजिवदादा माने, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कालिंदा पवार, विभागीय कृषि सहसंचालक किसनराव मुळे, माफसूचे संचालक अनिल भिकाने,क्षजिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, एसएस इंजिनिअर्सचे एस.बी.भड आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी मेळावा आणि उस पीक परिसंवाद कार्यक्रमामुळे उस पिकाविषयी शेतकऱ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सध्या तीन साखर कारखाने सुरू आहेत. बोदेगाव येथील जय किसान साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी अनेक महिन्यांपासूनच्या पाठपुराव्याला यश आले. लवकरच हा कारखाना सूरू होईल. शेतकऱ्यांनी उस पिकाची लागवड करावी. या भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. अडाण धरणाचे पाणी पोहोचविण्यासाठी दोनशे कोटींच्या प्रस्तावला मंजुरी दिली आहे. तसेच राज्यात कोट्यवधींची जलसंधारणाची कामे सुरु असून येणाऱ्या काळात हजारो कोटींची कामे केली जाणार आहेत, असे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले.

विद्युतीकरण आणि त्यासाठीच्या पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर झाले आहे. यामुळे विजेचाही प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल. शेतकऱ्यांना सर्व सोयीसुविधा देण्यात प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबर उस या नगदी पीक उत्पादनावर भर द्यावा. उसाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला जाईल. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात नक्कीच समृद्धी येईल. उस लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. जय किसान साखर कारखाना सुरु करण्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल. शेतकऱ्यांनी हा आपला साखर कारखाना समजावा, शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया म्हणाले की, शेतकऱ्यांनी कृषी उत्पादकतेवर भर दिला पाहिजेत. कापूस, तुर, गहू आणि सोयाबीन या पारंपरिक पिकांबरोबर ऊस उत्पादनाची संधी शेतकऱ्यांना आहे. ऊस उत्पादनातून साखरेसोबत इथेनॅाल, वीज निर्मिती केली जाते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. शासनाच्या विविध अनुदान योजना सुरू आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक मदत व सहकार्य केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here