‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राज्यात झालेले कार्य कौतुकास्पद – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

            पुणे, दि. २६ : देशभरात सुरू असलेल्या ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या माध्यमातून राज्यात झालेले कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

             सी.ओ. ई. पी. तांत्रिक विद्यापीठ येथे नेहरू युवा केंद्र संघटक, राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग  यांच्यावतीने आयोजित महाराष्ट्र अमृत कलश संकलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सावित्रीबाई फुले विद्यापिठाचे कुलगुरु सुरेश गोसावी, माझी माती माझा देश या उपक्रमाचे राज्याचे संयोजक राजेश पांडे, विविध विद्यापीठाचे कुलगुरू, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘माझी माती माझा देश’ हा उपक्रम संपूर्ण देशभरात सूरू आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक गावातील पवित्र माती संकलित करून देशाच्या राजधानीत अमृत वाटीका तयार करण्यात येणार  आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणारे, स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेणारे आणि  स्वातंत्र्य टिकवण्यासाठी देशाच्या सिमेवर तैनात असलेल्या सैनिकांना वंदन करण्यासाठीचा  हा कार्यक्रम आहे.

            महाराष्ट्रात ५ हजार महाविद्यालये व ४२  विद्यापीठे आहेत.  त्यामध्ये ३३ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून  २ कोटी नागरिक  देशभक्तांच्या भूमीतील मातीसोबत सेल्फी घेऊन विक्रम करतील असा प्रयत्न  आहे. त्यापैकी ५० लाख सेल्फीचे उद्दिष्ट उच्च व तंत्रशिक्षण  विभाग पूर्ण करेल, अशी ग्वाही देवून संपूर्ण देशभरात  १४२  कोटी नागरिकांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होण्याच्यादृष्टीने हा स्तुत उपक्रम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            श्री. नड्डा म्हणाले,  देशात सूरू झालेल्या ‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमाअंतर्गत देशातील प्रत्येक ठिकाणाहून माती संकलित करून देशाच्या राजधानीत अमृत वाटीका तयार करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. या उपक्रमाअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशाच्या एकतेची भावना रूजविण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्येक गावातील शाळेच्या प्रांगणात शहीद जवानाच्या नावाचा फलक लावणे आवश्यक आहे. प्रत्येक गावात देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ७५ वृक्षाचे रोपण करण्यात येईल.

            भारत हा आज जगातील ५ वी आर्थिक सत्ता बनला आहे. जी-२० परिषदेचे नुकतेच भारतात आयोजन करण्यात आले होते. देशातील ६० ते ७० ठिकाणी जी-२० च्या परिषदा संपन्न झाल्यात.  नुकतेच आपण महिलांच्या सक्षमीकरणाकरीता संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करून महिलांचा सन्मान केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ पोहोचवून आपण विक्रम केला आहे,  असेही ते म्हणाले.

            यावेळी आमदार श्री. बावनकुळे यांनीही  विचार व्यक्त केले.  प्रास्ताविकात श्री. पांडे यांनी राज्यात ‘माझी माती माझा देश’ या अभियानाअंतर्गत केलेल्या कार्याची माहिती दिली.

            यावेळी राज्यातील  ३३  विद्यापीठाने विविध ठिकाणाहून गोळा केलेली माती एका कलशात संकलित करण्यात आली. माती संकलित केलेला अमृत कलश मान्यवरांच्या हस्ते श्री. नड्डा यांच्याकडे सपूर्द करण्यात आला. तसेच पुण्यातील शहीद जवान बाळासाहेब ओझरकर यांची पत्नी साधना ओझरकर यांनीही अमृत कलशामध्ये मातीचे संकलन केले. यावेळी सर्व उपस्थितांनी पंचप्राण प्रतिज्ञा घेतली.

00000