मुंबई, दि.२९ : राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम,उपक्रम राबविण्यात यावेत तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका व नगरपालिका, नगर परिषद यांनी व्यापक प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिल्या आहेत.
राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर २०२३ हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याबाबतचे परिपत्रक सामाजिक न्याय विभागाच्यावतीने निर्गमित करण्यात आले आहे. या दिवशी सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र, परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सचिव श्री. भांगे यांनी सांगितले आहे.
******
शैलजा पाटील, वि.सं.अ.