राज्यातील रोहयोची मंजूर कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री संदिपान भुमरे यांचे निर्देश

मुंबई, दि. ३ : राज्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे तत्काळ सुरू करण्यात यावीत, असे निर्देश रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले.

मंत्री श्री. भुमरे यांच्या शासकीय निवासस्थानी रोजगार हमी योजनेच्या विविध उपक्रमांच्या अंमलबजावणी विषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपसचिव संजना खोपडे उपस्थित होते.

मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, राज्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करण्यात आली आहेत. काही भागात पाऊस असल्याने कामांना सुरुवात झाली नसेल, तर ती कामे तत्काळ सुरू करण्यात यावीत. ज्या ठिकाणी काही समस्या निर्माण होत आहेत त्यांनी शासनाकडे तत्काळ मार्गदर्शन मागवावे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मंजूर कामे पुढील आठवड्यात सुरु करुन त्याचा अहवाल द्यावा अशीही सूचना मंत्री श्री भुमरे यांनी केली.

यावेळी नाशिक जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पडोळ, गट विकास अधिकारी नम्रता जगताप यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0000

राजू धोत्रे/विसंअ