मुंबई, दि. ४ : घरगुती नळजोडणीची कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुणे विभागातील घरगुती नळजोडणीची प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करुन दैनंदिन कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
पुणे विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, जलजीवन मिशन आणि जिल्हा परिषदेचे पुणे विभागातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, पुणे विभागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेकडील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करावीत. ठेकेदारांच्या कामाबाबत तक्रारी येऊ नये. ज्या तीर्थक्षेत्राला पाणीपुरवठा योजनेची गरज आहे तेथील योजनेचा सुधारित आराखडा तत्काळ सादर करण्यात यावा.
पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजनाची कामे बंद पडली आहेत, त्याचा आढावा घेऊन ती कामे पुन्हा तत्काळ सुरू करावीत. घरगुती नळजोडणीची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावी याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. ‘हर घर जल’ योजनाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या पाणीपुरवठा योजनांना पाणी मिळण्यासाठी अडचणी आहेत त्या योजनांना कालवा सल्लागार समिती मार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. जिल्हा परिषदेच्या नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.
0000
दत्तात्रय कोकरे/विसंअ/