मुंबई, दि. ४ : धाराशिव जिल्ह्यातील भूम ग्रामीण रुग्णालयात 14 महिन्यांच्या बालकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारित झाले. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रुग्णालयाला भेट दिली. तसेच मृत बालकाच्या नातेवाईकांची त्यांच्या गावी जाऊन भेट घेत विचारपूस केली. ग्रामीण रुग्णालय, भूम येथे 150 एलपीएम क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आहे. तसेच ड्युरा ऑक्सिजन प्रकल्प व सेंट्रल ऑक्सिजन लाइन असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, धाराशिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
बालकाच्या नातेवाईकांच्या घरी भेट दिली. या बालकाला अत्यवस्थ स्थितीमध्ये खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. रुग्णाची नाडी लागत नसल्यामुळे व परिस्थिती गंभीर असल्याने त्यांनी बालकास ग्रामीण रुग्णालय, भूम येथे संदर्भित केले. या बालकावर पूर्वीपासून उपचार सुरू होते. या प्रकरणामध्ये चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करण्यात येणार आहे, असेही जिल्हा शल्य चिकित्सक यांनी म्हटले आहे.
००००
नीलेश तायडे/विसंअ/