सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून राज्यात आदर्श शाळांची निर्मिती करणार – मंत्री गिरीष महाजन

0
5

मुंबई, दि. ५ : राज्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन आणि कार्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून आदर्श शाळा निर्मितीचे उदिष्ट यशस्वी होऊ शकते, असे  प्रतिपादन ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

ग्राम विकास विभागांतर्गत ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या वतीने अलीकडेच मुंबई येथे राज्यातील कार्पोरेट कंपन्यांची सी.एस.आर. परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, व्हीएसटीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजाराम दिघे उपस्थित होते. तसेच परिषदेमध्ये जेएसडब्ल्यू फाऊंडेशन, रिलायन्स फाऊंडेशन, एसटीएल, इन्फोसिस, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि., सिध्द‍िविनायक ट्रस्ट, राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स, ॲक्स‍िस बँक, रोबोटिक्स इंडिया, मॅरीको आदी प्रमुख कंपन्यांसह विविध कंपन्याचे अधिकारी व प्रतिनिधी सहभागी झाले होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, राज्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनमार्फत सन २०२० पासून आदर्श शाळा विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यातून आदर्श शाळांची निर्मिती होत आहे.

प्रधान सचिव श्री. डवले यांनी व्हीएसटीएफमार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सीएसआर मार्फत विविध गावांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांना शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी कार्पोरेट कंपन्याना सामंजस्य करार करण्याचे आवाहन केले.

परिषदेमध्ये ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिघे यांनी मिशन महाग्राम अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले.  तसेच त्यांनी आदर्श शाळा विकास कार्यक्रमाची माहिती देऊन परिषदेत सहभागी कार्पोरेट कंपन्यांसोबत स्वतंत्र बैठका घेऊन सामंजस्य करार करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खलाणे ता. शिंदखेडा, जिल्हा धुळे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारगाव जिल्हा अहमदनगर या शाळांचे ग्राम विकास मंत्री श्री. महाजन यांचे हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. शाळांमध्ये गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. तसेच त्यांनी आदर्श शाळा विकास कार्यक्रमाच्या संकल्पना पुस्तिकेचे प्रकाशन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य अभियान व्यवस्थापक दिलिपसिंह बायस यांनी, तर आभार प्रदर्शन राज्य अभियान व्यवस्थापक प्रफुल्ल रंगारी यांनी केले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here