जिल्हा परिषद यंत्रणेकडील जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

पुणे, दि. 5 : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद यंत्रणेकडील 2022-23 मध्ये मंजूर कामांच्या प्रगतीचा आढावा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज घेतला. निधी अखर्चित राहू नये यासाठी कामांचा वेग वाढवावा, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, 2022-23 मध्ये मंजूर कामे दोन वर्षाच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असल्याने निधी अखर्चित राहू नये यासाठी या कामांचा वेग वाढवून डिसेंबरच्या आत पूर्ण करण्यात यावीत. कार्यारंभ आदेश देणे प्रलंबित असलेल्या प्रकरणात तातडीने कार्यवाही करत कामांना सुरूवात करावी.

यावेळी ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान तसेच  मोठ्या ग्रामपंचायतींसाठी नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान अंतर्गत गावांतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भुयारी गटार, सांडपाणी व्यवस्थापन आदी कामांबाबत आढावा घेण्यात आला. यात्रा स्थळांचा विकास अंतर्गत क वर्ग तिर्थक्षेत्र विकासाची कामे, 3054 व 5054 शीर्षांतर्गत ग्रामीण मार्ग बांधकाम, इतर जिल्हा मार्ग बांधकाम व मजबुतीकरणांतर्गत रस्त्यांच्या कामांच्या प्रगतीचा, प्राथमिक शाळा विशेष दुरुस्ती, नवीन अंगणवाडी बांधकाम यांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात आलेला परंतू कालमर्यादेत कामे हाती न घेतल्यामुळे अखर्चित असलेला निधी परत मागवून घेण्याची प्रक्रिया तत्काळ करावी, असे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

जलसंधारणाच्या कामांसाठी जेसीबी, पोक्लेन अशी यंत्रणा जलसंपदा विभागामार्फत द्यावीत. त्याला डिझेलसाठी निधी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत देता येईल, असेही श्री. पाटील म्हणाले.

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकाम, दुरुस्ती आदींविषयीही आढावा घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधांचा पुरेसा साठा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जीवनरक्षक औषधी खरेदीच्या अनुषंगाने अधिकारांचे विकेंद्रीकरणाबाबत शासनस्तरावरुन निर्णय झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

चारा उत्पादनासाठी बियाणे वाटपाचा आढावा घेऊन चारा उत्पादनावर भर देण्याच्या सूचना मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या. उजनी धरणातील गाळपेर क्षेत्रावर चारा उत्पादनाचा मोठा कार्यक्रम हाती घ्यावा, असेही ते म्हणाले.

****