आर्थिक दुर्बलांनी स्वत:चे ‘आयुष्मान भारत’ कार्ड बनवावे – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) – ‘आयुष्मान भारत’ योजनेत (एबीवाय) जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना प्रतिवर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जाणार असून त्यासाठी आवश्यक असणारे आयुष्मान कार्ड जिल्ह्यातील प्रत्येक गरजू नागरिकाने तयार करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज म्हसावद (ता. शहादा) येथे आयोजित आयुष्मान भारत शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी सरपंच शशिकांत पाटील, उपसरपंच सविता पाटील, प्रांताधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार दीपक गिरासे ,म्हसावद पोलीस ठाण्याचे  सहायक पोलीस निरीक्षक राजन मोरे, सचिन पावरा, सत्येम वळवी, डॉ. भगवान पाटील, डॉ. सुरेश नाईक डॉ. राजेश वसावे , डॉ.जर्मन पाडवी, डॉ.दीपक वसावे,डॉ. एस. बागुल, डॉ.ए.आर. शेख कल्पेश मोरे विवेक अहिरे अधीपरीचारिका वैशाली यादव, दामिनी भावसार विरसिंग ठाकरे, युवराज ठाकरे यांच्यासह पंचक्रोशीतील रूग्ण, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आयुष्मान भारत योजनेच्या शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. या योजनेत लाभार्थी रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना कोणतीही फी भरावी लागणार नाही. रुग्णालयात दाखल झाल्यापासून उपचाराचा संपूर्ण खर्च या योजनेच्या माध्यमातून कव्हर केला जाईल.रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतरचा खर्चही कव्हर केला जाईल. योजनेच्या पॅनलमध्ये सामील प्रत्येक रुग्णालयात एक ‘आयुष्मान मित्र’ असेल. तो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हरसंभव मदत करेल व त्याला रुग्णालयातील सुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरि मदत करेल. रुग्णालयात एक हेल्प डेस्क सुद्धा असेल जेथे कागदपत्र तपासणी, योजनेत नामांकनासाठी व्हेरिफिकेशन यासाठी मदत केली जाईल. आयुष्मान भारत योजनेत सामील व्यक्ती जिल्हा राज्य वदेशातील कोणत्याही शासकीय अथवा सरकारी व पॅनलमध्ये समाविष्ट खासगी रुग्णालयात मोफत उपचार प्राप्त करू शकेल. आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालयात सर्व प्रथम उपचार केले जातील, त्यानंतर आपल्यावर मोठ्या शस्रक्रिया करण्याची आवश्यकता भासल्यास नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार केले जातील असे सांगून ते पुढे म्हणाले, आयुष्मान भारत योजनेत जवळपास सर्व आजारांवर उपचार व रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च कव्हर केला जातो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान भारत योजनेत 1354 पॅकेज सामील केले आहेत. यामध्ये कोरोनरी बायपास, हत्तीपाय रोग, दीव्यांगांच्या विविध शस्रक्रिया, गुडघे बदलणे व स्टंट लावण्यासारखे उपचारही सामील आहेत.

ग्रामीण भागात पक्के घर नसलेले, कुटुंबातील वयस्क, कुटुंब प्रमुख महिला असणे, कुटूंबात कोणी दिव्यांग असणे, अनुसूचित जाती जमातीमधील व्यक्ती, भूमिहीन व्यक्ति, वेठबिगार मजूर यांना या योजनेसाठी पात्र समजले जाते. त्याचबरोबर ग्रामीण परिसरातील बेघर व्यक्ति, निराधार, आदिवासी बांधव कोणतही प्रक्रिया न करता आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात. शहरी भागात योजनेत सामील होण्यासाठी कचरा वेचणारे, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, शिवणकाम करणारे, फेरी वाले, रस्त्यावर काम करणारे अन्य व्यक्ती, कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे मजूर, प्लंबर, मिस्त्री, पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक, हमाल व सामान वाहून नेणारे अन्य कामगार. सफाई कर्मचारी, मोल मजूरी करणारे, हस्तकलाकार, टेलर, ड्रायव्हर, रिक्षा चालक, दुकानात काम करणारे लोक आदिंना आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र ठरवण्यात आले आहे, असेही यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

यावेळी 56 वर्षिय दगडू बसिर तेली यांचा रक्तदाता म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.