मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.
नामशेष होत चाललेल्या वन्य पशुपक्षांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वन विभागाच्या वतीने राज्यात दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान ‘वन्यजीव सप्ताह’ साजरा केला जातो. या कालावधीत वन्य जीवविषयी निबंध, चित्रकला स्पर्धा घेणे, वन्यजीव तज्ज्ञ, पक्षी मित्र यांचे व्याख्यान आयोजित करणे, वन्यजीवविषयी माहिती व चित्र प्रदर्शन दाखवणे, पक्षी निरीक्षण करणे इत्यादी उपक्रम वन विभागामार्फत राबविण्यात येतात. या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग कसा होता, या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात आली याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख श्री. टेंभुर्णीकर यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत उद्या मंगळवार दि. 10, ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक शंतनू ठेंगडी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
0000