रोहा येथील नियोजित १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

मुंबई, दि. १० : रोहा (जि. रायगड) येथील नियोजित  १०० खाटांचे  मौजे भुवनेश्वर येथे होणाऱ्या स्त्री रुग्णालयाचा सर्वसमावेशक आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करावा, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

मौजे भुवनेश्वर ता. रोहा येथे होणाऱ्या प्रस्तावित महिला रुग्णालयाच्या बांधकामाबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी रायगडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, सार्वजनिक बांधकाम विभाग रोहाचे उपअभियंता विजय बागूल, सार्वजनिक बांधकाम  विभागाने नियुक्त केलेले वास्तू विशारद उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, या रुग्णालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पाच एकर जागा प्राप्त झाली आहे. प्रस्तावित करण्यात आलेले महिला रुग्णालय अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असावे. यासाठी आराखडा बनवताना तो सर्वसमावेशक करावा. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी खर्चाचे  अंदाजपत्रक तत्काळ प्राप्त करून घ्यावीत, जेणेकरून शासनाला विहित वेळेत प्रस्ताव सादर करता येईल. महिला रुग्णालय मुख्य इमारत व त्या अनुषंगिक सोयीसुविधांचा सविस्तरपणे अभ्यास केला जावा. यामधील तज्ञ व्यक्तींकडून अभ्यासपूर्ण उपाययोजना केल्या जाव्यात याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल.

***

संध्या गरवारे/विसंअ/