नागरिकांना वैद्यकीय कारणासाठी आवश्यक असलेले दाखले तातडीने देण्याचे मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांचे निर्देश

मुंबई, दि. 11 : नागरिकांना वैद्यकीय कारणांसाठी उत्पन्नाचा दाखला हवा असल्यास तो तातडीने देण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

पालकमंत्री श्री.केसरकर हे दर बुधवारी मुंबईतील नागरिकांशी सुसंवाद साधत आहेत. त्याअंतर्गत बुधवारी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय येथे संवाद साधताना, ज्यांना वैद्यकीय कारणासाठी उत्पन्नाचा दाखला हवा असेल त्यांना तो तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, नागरिकांची कामे तातडीने व्हावीत, यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांशी प्रत्येक बुधवारी सुसंवाद साधला जात आहे. येथे येणाऱ्या विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा यावे लागू नये, याची दक्षता घ्यावी. त्यांचे दाखले घरपोच देण्यात यावेत. त्याचप्रमाणे जे दाखले तातडीने देणे शक्य आहेत ते निश्चित कालावधीत द्यावेत. यासाठी नागरिकांना फेऱ्या मारण्याची आवश्यकता पडू नये, असे त्यांनी सांगितले.

आज प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, मालमत्ता पत्रावर नाव लावणे, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला मिळणे आदींसाठी नागरिकांनी अर्ज केले होते. मंत्री श्री.केसरकर यांनी त्याची दखल घेऊन निश्चित वेळेत दाखले देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले. यावेळी तयार असलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यांचे तसेच तात्पुरत्या गौण खनिज परवान्यांचे श्री.केसरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/