महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘ग्रंथचर्चा व अभिवाचन’

मुंबई, दि. ११ – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या 15 ऑक्टोबर या जन्मदिनी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास’ या पुस्तकावर चर्चा व अभिवाचनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डॉ.रमेश वरखेडे व डॉ.नितीन रिंढे तसेच अभिवाचक म्हणून डॉ.मंगला वरखेडे व श्रीनिवास नार्वेकर सहभागी होतील.

महाराष्ट्राच्या भौतिक प्रगतीबरोबरच भाषा, साहित्य, कलाकल्पना, वस्त्रप्रारणे, खाद्याभिरुची, निती संकल्पनांचा आशय केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राचा विस्तृत विवरणात्मक असा सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास मांडणारा व मोठ्या कालपटाचा वेध घेणारा, महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात मोलाची भर टाकणारा हा मौलिक व संदर्भमूल्य असलेला ग्रंथ आहे.

रविवार, दिनांक 15 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 11 वाजता न्यू मिनी थिएटर, पाचवा मजला, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, प्रभादेवी, मुंबई येथे ग्रंथचर्चा व अभिवाचन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तो सर्वांकरता खुला आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/