कर्मचारी विमा महामंडळाची रुग्णालये कामगार विभागाकडे हस्तांतरित करावीत – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे निर्देश

मुंबई, दि. 12 : कर्मचारी राज्य विमा महामंडळाची रुग्णालये (इएसआयसी) ही इतर राज्यात कामगार विभागाकडून अतिशय उत्तम पद्धतीने संचालित केली जात आहेत. महाराष्ट्रातील रुग्णालये सुद्धा कामगार विभागाकडून संचलित करण्यासाठी ती कामगार विभागाकडे तत्काळ हस्तांतरित करावीत, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महाराष्ट्र क्षेत्रातील प्रादेशिक मंडळाची ११४ वी बैठक आज मंत्रालयातील परिषद कक्षात कामगार मंत्री तथा ईएसआयसी राज्य अध्यक्ष डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, ई. एस.आय सी चे विभागीय संचालक तथा सदस्य सचिव अनील साहू, सदस्य संगीता जैन, रवींद्र झिमटे, वैद्यकीय आयुक्त डॉ. सी. सी. खाका, विमा आयुक्त तसेच सर्व वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.

राज्यात असलेली ईएसआयसी रुग्णालये ही सर्व आजारांचा उपचार करणारी, सुपर स्पेशालिटी रुग्णालयांसारखी असावीत. तसेच त्यांना जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये जोडून घ्यावीत. रुग्णालयातील डॉक्टरांच्या 156 रिक्त पदांचा प्रस्ताव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आलेला आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रुग्णालयासाठी अत्यावश्यक असणाऱ्या डॉक्टरांची सेवा कंत्राटी पद्धतीने घेण्यात यावी, असे श्री. खाडे यांनी सांगितले. तसेच जी रुग्णालये जोडलेली आहेत त्यांची देयके त्वरीत अदा करण्यात यावी. वैद्यकीय मंडळ पुनर्गठित करण्यासाठीचे नियम, अटी, शर्ती इत्यादी माहिती पुरविण्यात यावी. विचार विनिमय करून याबाबत निर्णय घेण्यात येईल.

हिंगोली आणि नंदुरबार येथे कर्मचारी संख्या चांगली असल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात दवाखाने सुरु करण्यासाठी शासनाकडून जागा मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. शासकीय जागा उपलब्ध नसल्यास इमारत भाड्याने घेऊन दवाखाने सुरु करावेत, असेही मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

००००

मनीषा सावळे/विसंअ/