‘आसियान’ देशांच्या राजदूतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0
6

मुंबई, दि. १७ : आसियान (ASEAN) राष्ट्रांच्या संघटनेतील देशांच्या राजदूतांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. भारत आणि आशियाई राष्ट्रांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होण्यासाठी प्रयत्न करतानाच महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वर्षा निवासस्थानी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजदूतांचा आणि उच्चायुक्तांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, विकास आयुक्त दीपेद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

यावेळी शिष्टमंडळामध्ये ब्रुनोई आणि सिंगापूरच्या उच्चायुक्तांसह कम्बोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम या देशांच्या राजदूतांचा समावेश होता.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र हे आशियाई देशांमध्ये सर्वाधिक निर्यात करणारे देशातील राज्य आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन असून मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. एमटीएचएल, कोस्टल रोड, मेट्रोचे जाळे यासारख्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र भारतात अग्रेसर असून राज्यात औद्योगिक विस्तारासाठी पोषक वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.

औद्योगिक विस्तारासाठी महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असून उद्योगांचे समूह विकसित करण्यात आहे. उद्योगपूरक धोरण आणि गतिमानतेने उद्योगांना परवानगी देण्याचे धोरण राज्य शासनाने अंगीकारले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्याच्या आर्थिक विकास परिषदेने २०२८ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

००००

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here