अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळीच्या व्यापकतेसाठी ‘खबर’ मदतवाहिनी कार्यान्वित – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक : 17 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळ अधिक व्यापक करून अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याकरिता तसेच जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी पोलीस प्रशासना मार्फत ‘खबर’ ही मदतवाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे. नागरिकांनी या मदतवाहिनीच्या माध्यमातून अवैध व्यवसायांची माहिती द्यावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळीबाबत आयोजित बैठकीत पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते. या बैठकीस आमदार सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, पोलीस प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या खबर मदतवाहिनी क्रमांक 6262256363 व 8263998062 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर अवैध व्यवसायांबद्दल नागरिकांनी माहिती दिल्यास संबंधित व्यक्तिची माहिती ही गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच या दोन्ही क्रमांकांवर प्राप्त तक्रारींनुसार संबंधित विभागांनी आठ दिवसांत कारवाई करावी. त्याचप्रमाणे काही दिवसांपासून उघडकीस येत असलेल्या बेकायदेशीर घटनांबाबत सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच ज्या परिक्षेत्रात बेकायदेशीर व अवैध व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास येईल त्यावर तातडीने आवश्यक कारवाई न झाल्यास तेथील सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

सामाजातील शांतता, कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर तत्काळ कडक कारवाई करावी. त्याचप्रमाणे युवा पिढीला अमली पदार्थ व व्यसनांच्या अधिन जाण्यापासून रोखण्यासाठी  शाळा, महाविद्यालयांनी देखील त्यांच्या स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. त्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहाय्य त्यांना पुरविण्यात येईल. तसेच शाळा व महाविद्यालये सुटण्याच्या वेळी त्याठिकाणी परिसरातील पोलीस स्टेशनच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात यावा. जेणेकरून शाळा व महाविद्यालये सुटल्यानंतर पालकांव्यतिरिक्त इतर गुंड प्रवृत्तीचे तरूण शालेय व महाविद्यालयीन परिसरातील शांतता, कायदा व सुव्यवस्था भंग करणार नाहीत, तसेच त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत आवश्यक त्या उपाययोजना पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात याव्यात, अशा सूचनाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, महाविद्यालय स्तरावर पालक, पोलीस यंत्रणेतील एक अधिकारी, अन्न व औषध विभागाचे अधिकारी, स्वयंसेवी संघटना, डॉक्टर्स अशा व्यक्तींचा समावेश असणारी समिती तयार करण्यात यावी. ही समिती महाविद्यालयांमधील विद्यार्थी अमली पदार्थांच्या व्यसनांपासून दूर राहतील, यासाठी आवश्यक नियोजन करेल. त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासनामार्फत संशयित मेडिकल्स, किराणा दुकाने यांची तपासणी करून त्यामध्ये काही अवैध घटक आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी दिल्या.

या बैठकीच्या सुरूवातीला उपस्थित आमदार, महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळीच्या अनुषंगाने काही मौखिक सूचना मांडल्या.

मेरी माटी मेरा देश अभियाना अंतर्गत नगरपालिकांचे अमृत कलश जिल्हास्‍तरावर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशपातळीवर 1 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत मेरी माटी मेरा देश अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या अमृत कलशांमधील माती जिल्हा प्रशासनाच्या अमृत कलशात पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते एकत्रित करण्यात आली. सर्व नगरपालिकांमधून एकत्रित केलेला हा अमृत कलश जिल्हास्तरावरून दिल्ली येथे नेण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, नगरपालिका प्रशासन अधिकारी शाम गोसावी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

000