छत्रपती संभाजीनगर, दि.20 : राज्यातील वीज वितरण कंपन्यांची कार्यक्षमता वाढवून केंद्र सरकारच्या आर्थिक सहाय्याने सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) राबविण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरासह ग्रामीण भागातील विद्युत व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासोबतच प्रत्येक घटकाला अखंडीत विजपुरवठा करण्यावर शासनाचा भर आहे. आरडीएसएस योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामामध्ये गती देण्यासोबतच विद्युत उपकेंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा, असे निर्देश केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज राज्यमंत्री डॉ. कराड यांनी सुधारित वितरण क्षेत्र योजनेचा (आरडीएसएस) आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्तपदी मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त जगदिश मिनीयार, महावितरणचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
डॉ. कराड म्हणाले, राज्यातील वीज वितरण प्रणाली वृध्दींगत करण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक सहाय्याने सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे वीज वितरण प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल घडून येणार आहे. वीज वितरण पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, पुरवठ्याची गुणवत्ता व उपलब्धता यात सुधारणा करणे, स्मार्ट मिटरिंग करून वीजहानी कमी करण्याच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे अशी ही वैशिष्टपुर्ण् योजना आहे. आपल्या महानगरासह संपूर्ण जिल्हयात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून या योजनेसाठी आपल्या जिल्हयाला 3 हजार 800 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे.
सुधारित वितरण क्षेत्र योजना योजनेच्या कामात असलेल्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत. विद्युत उपक्रेंद्रासाठी आवश्यक असलेल्या जागा उपलब्धतेसाठी 63 ठिकाणी असलेली जागेचीउपलब्धता तत्परतेने करून देण्यात येणार आहे. यासाठी सबंधित ज्या विभागाची जागा आहे, त्या विभागाने सात दिवसाच्या आत ना हारकत प्रमाणपत्र द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या. आपण याबाबत सातत्याने आढावा घेणार असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले.
सुधारित वितरण क्षेत्र योजनेची (आरडीएसएस) उद्दिष्ट्ये साध्य करण्याकरिता नियोजन करावे व सोलर रूफ टॉप योजनेतून ग्राहकांना तत्परतेने जोडणी मिळण्यास महावितरण अधिकारी, कर्मचारी व एजन्सीने वेग वाढवावा. यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजने अंतर्गत आपल्या जिल्हयात चांगले काम सुरू असून सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी महानगरासह जिल्हयात आपण बँकेच्या सहकार्याने सौर ऊर्जेसाठी योजना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. केळे यांनी सुधारित वितरण क्षेत्र योजनेची (आरडीएसएस) माहिती दिली. महानगरासह जिल्हयात उपक्रेद्रासाठी आवश्यक असलेल्या जागेबाबतच्या अडचणीही त्यांनी सांगितल्या.
यावेळी महावितरण, कृषी, वन, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते