यवतमाळ, दि.20 (जिमाका) : सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ द्या. अभियानांतर्गत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम आयोजित असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
शासन आपल्या दारी अभियानाचा महसूल भवन येथे आयोजित बैठकीत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, बांधकामचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी वैशाली रसाळ यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाच्या नियोजनाचा पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. या समित्यांच्या प्रमुखांकडून तयारीची माहिती पालकमंत्र्यांनी घेतली.
जिल्हाभरातून येणाऱ्या लाभार्थ्यांची वाहतूक, भोजन, पाणी व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना सुखरून आणून त्यांना पोहोचविण्यात यावे. भोजन, पाणी व वाहतूक व्यवस्थेत त्रुट्या राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
आयोजनाच्या यशस्वीतेसाठी एकून 31 समित्या तयार करण्यात आल्या आहे. त्यात समन्वय समिती, सभा मंडप, वाहतूक, भोजन, वाहन, लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण, स्टॅाल व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पाणी पुरवठा, वाहनतळ, निवेदन समिती, विद्युत व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध समित्यांचा समावेश आहे. या समित्यांसाठी समिती प्रमुखाची नेमणूक करण्यात आली असून समिती प्रमुखाकडून त्या-त्या समितीच्या तयारीचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.
राज्यभर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा उपक्रम होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात हा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने झाला पाहिजे. जिल्ह्याचे वैशिष्ट्य, नाविन्य या कार्यक्रमातून दिसले पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले. विविध विभागाचे जवळपास 35 स्टॅाल कार्यक्रमस्थळी राहणार आहे. याठिकाणी लाभार्थ्यांना त्या-त्या विभागाच्या योजना व इतर उपक्रमांची माहिती उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री सचिवालयाचे दालन
लाभार्थ्यांना आपल्या अडीअडचणींची निवेदने मुख्यमंत्र्यांना द्यावयाची असतात. अशी निवेदने स्विकारण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयाचे स्वतंत्र दालन कार्यक्रमस्थळी राहणार आहे. या ठिकाणी चार वेगवेगळी पथके राहणार असून त्यांच्याद्वारे निवेदन स्विकारून निवेदनकर्त्यांना पोच दिली जातील. सर्वसामान्यांची निवेदने स्विकारून त्यावर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले.
000