‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत उद्या २७ ऑक्टोबरला अमृत कलश यात्रेनिमित्त कार्यक्रम

मुंबई, दि. 26 : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात शुक्रवार, दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता ऑगस्ट क्रांती मैदान येथे अमृत कलश यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून घरोघरी जाऊन स्वयंसेवकांनी कलशामध्ये संकलित केलेली माती या अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून नवी दिल्ली येथील कार्यक्रमासाठी पाठविली जाणार आहे.

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमामध्ये राज्यात एक सप्टेंबरपासून घरोघरी जाऊन जाणीव जागृती, मिट्टी गान, विविध वाद्य वाजवून ही माती गोळा करण्यात आली. स्वातंत्र्यासाठी आपले प्राण देणाऱ्या शहिदांप्रती कृतज्ञता म्हणून हा उपक्रम पूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. यामध्ये गावस्तरावर संकलित केलेले कलश तालुकास्तरावर आणून त्याचा तालुकास्तरावर एक कलश करुन ते मुंबई येथे ऑगस्ट क्रांती मैदान येथे आणण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यातून दोन स्वयंसेवक आणि जिल्हा समन्वयक  तसेच महानगरपालिकांचा स्वतंत्र कलश या स्वयंसेवकांमार्फत मुंबई येथे आणण्यात येणार आहेत. त्यानंतर सकाळच्या ऑगस्ट क्रांती मैदान येथील कार्यक्रमानंतर हे अमृत कलश विशेष रेल्वेने नवी दिल्ली येथे नेण्यात येणार आहेत.

ऑगस्ट क्रांती मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमास खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांनी केले आहे.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/