वीर अमर जवानांच्या गावातील माती संकलित करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या उमेश जाधव यांच्या उपक्रमाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून कौतुक

मुंबई, दि. 26 : “देशातील १८५ वीर अमर जवानांच्या गावी जावून त्यांच्या अंगणातील पवित्र माती कलशात एकत्र करणाऱ्या व राष्ट्रभक्तीतून जगावेगळी धडपड करणाऱ्या उमेश गोपीनाथ जाधव या छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाचा उपक्रम अभिनंदनीय, प्रेरणादायी आणि अनुकरणीय असून “मेरी माटी, मेरी देश” या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभियानाला मिळत असलेला प्रतिसाद “राष्ट्र प्रथम” ही भावना जागृत करण्यास प्रेरक ठरत आहे, असे प्रतिपादन वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

श्री. जाधव यांच्याकडून एकत्रित अमर जवानांच्या गावातील माती कलशाचे पूजन व अभिवादन करून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी त्यांच्या मलबार हिल येथील शासकीय निवासस्थानाहून दिल्लीकडे रवाना केली.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, “मेरी माटी, मेरा देश” या अभियानास देशभरात उत्तम प्रतिसाद मिळत असून सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राज्यातील एक हजार कुंभ घेऊन शुक्रवारी तरुण मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात एकत्र येणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  अजित पवार यावेळी उपस्थित राहतील. असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील उमेश जाधव या तरुणाने एक लाख 30 हजार किलोमीटर प्रवास करून अमर जवानांच्या गावी जाऊन माती एकत्र केली हे देशभक्तीचे अनोखे उदाहरण आहे. या त्यांच्या उपक्रमात सहभागी होताना विशेष अभिमान वाटत आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

शहीद अमर जवानांच्या कुटुंबीयांना भेटून ही माती जमविण्यासाठी मी देशभरात फिरलो, प्रत्येक ठिकाणी वेगळे अनुभव आले; शहीद जवानांच्या विधवांच्या डोळ्यातील विश्वास आणि देशभक्ती बघून अधिक प्रेरणा मिळत गेली. माझे सर्वांनी स्वागत केले. राज्यात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या संदर्भात व्यक्त केलेली संवेदनशीलता आणि सहकार्यांची भावना बघून अतिशय भावूक झालो आहे. त्यांचे प्रेरक वक्तव्य आणि देशभक्तीने ओतप्रोत विचार मला नवी ऊर्जा देऊन गेले, अशी प्रतिक्रिया श्री. जाधव यांनी यावेळी व्यक्त केली. दिल्ली येथे लष्कर मुख्यालयात ही माती अमृत वाटिकेसाठी देण्यात येईल, असे श्री. जाधव यांनी सांगितले.

000

दीपक चव्हाण/विसंअ/