माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाने सर्वसामान्यांसाठी लढणारा संघर्षयोद्धा हरपला -उपमुख्यमंत्री अजित पवार

 मुंबई, दि. 27 :- “माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे हे समाजातील गरीब, वंचित, दुर्बल घटकांच्या विकासासाठी लढणारे नेतृत्व होते. ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला.  विद्यार्थी चळवळीतून समाजकारणात सक्रिय असलेल्या बबनराव ढाकणे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची चिंता केली. बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधान परिषदेचे सदस्य, लोकसभेत खासदार, राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना प्रत्येक पदाला न्याय दिला. बबनराव ढाकणे हे लढाऊ नेतृत्व होत. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचे जीवन हे राजकीय, सामाजिक जीवनात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनाने संघर्षयोद्धा हरपला आहे. सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. बबनराव ढाकणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बबनराव ढाकणे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन आदरांजली वाहिली आहे.

००००