नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या कामांना गती द्यावी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई, दि. 30 : नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाची मंजूर कामे लवकरात लवकर सुरु करावीत. तसेच जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने प्रलंबित कामांना गती द्यावी असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विभागाच्या कामांबाबत आढावा बैठक मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री डॉ.गावित म्हणाले की, पर्यटन विकासाची प्रलंबित असणारी विविध विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे. तसेच ही कामे करत असताना कामांचा दर्जाही चांगला राहिला पाहिजे.

पर्यटन विकासाच्या अनुषंगाने प्रकाशा (ता. शहादा) येथील केदारेश्वर मंदिर येथे घाट बांधणे व सुशोभीकरण, तोरणमाळ येथील विकास कामे, अस्तंबा येथील विकास कामे, लघु तलाव चोपाळे येथील कृष्णा पार्क येथील कामांचा सविस्तर आढावा मंत्री डॉ.गावित यांनी यावेळी घेतला.

या बैठकीस नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय कलपे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

शैलजा पाटील/विसंअ/