अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

0
3

मुंबई, दि. 31 : अंगणवाडी सेविकांना मोबाईल संच खरेदीसाठी ११ हजार ८०० रुपये, अंगणवाडी सेविकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा हप्ता शासन भरणार असून अंगणवाडी सेविकांच्या अन्य मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

मंत्रालयात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत कृती समितीची बैठक आज झाली. त्यावेळी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांच्यासह महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे एम.ए.पाटील, शुभा शमीम, भगवान देशमुख, सुवर्णा तळेकर, सरिता मांडवकर उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने झालेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी सेविकांसाठी विविध घोषणा केल्या आहेत. केंद्राच्या सूचना प्राप्त होताच त्याची राज्यस्तरावर अंमलबजावणी करण्यात येईल. यामध्ये अंगणवाडी सेविकांना मोबाईल संच घेण्यासाठी ११ हजार ८०० रुपये, अंगणवाडी सेविकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा हप्ता शासन भरणार असून, ३००० अंगणवाडी सेविकांना लवकरच पदोन्नतीही मिळणार आहे. मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रुपांतर करण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीविषयक लाभ ही बाब धोरणात्मक असून त्याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर हा विषय सादर करण्यात येईल. अंगणवाडी सेविकांना दरमहा पाच तारखेच्या आत मानधन मिळावे आणि इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही मंत्री कु. तटकरे यांनी कृती समितीला दिली.

******

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here