विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

0
6

मुंबई, दि. 31 : विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद असते. स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ते सिद्ध केले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वच्छतेचे स्वप्न विद्यार्थी प्रत्यक्षात आणत आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनून उत्कृष्ट कार्य केलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते ‘लेटस् चेंज अभियानांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर्स’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा गौरव सोहळा तसेच दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ सोहळा आज येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित करण्यात आला. यावेळी प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सहसचिव इम्तियाज काझी, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, प्रकल्प संचालक रोहित आर्या, गांधीजींची वेशभूषा करून स्वच्छता मॉनिटर्स प्रकल्पाला पाठिंबा देणारे शरद नयनपल्ली यांच्यासह राज्यात प्रभावी कामगिरी केलेल्या 100 शाळांमधील 300 विद्यार्थी, उत्कृष्ट काम केलेल्या जिल्ह्यांचे समन्वयक आणि शिक्षणाधिकारी उपस्थित होते. प्रकल्पाचा दुसरा टप्पा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, भारत हा तरुणांचा देश आहे. आजचे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून विद्यार्थ्यांना जगभराचे क्षीतिज मोकळे झाले आहे. भविष्यात याच विद्यार्थ्यांनी जगाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली असून राज्यात स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावी कार्याद्वारे आपली क्षमता सिद्ध केली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीचे पत्र उत्कृष्ट कार्य केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जाणार असल्याचे सांगून दुसऱ्या टप्प्यासाठी मंत्री श्री.केसरकर यांनी शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी परिसर स्वच्छ राखण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यांचा झाला गौरव

मंत्री श्री.केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पात उत्कृष्ट कार्य केलेल्या बुलढाणा, जालना, मुंबई उपनगर, सातारा, सोलापूर आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या समन्वयक आणि शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे या जिल्ह्यातील प्रभावी कामगिरी केलेल्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, अंकुशनगर, जि.जालना; मत्स्योदरी विद्यालय, अंबड, जि.जालना; युगधर्म पब्लिक स्कूल, बुलढाणा; आदर्श जि.प. स्कूल, बोरखेडी, जि.बुलढाणा; एन.व्ही. चिन्मया विद्यालय, शेगाव आणि जनता हायस्कूल, जालना या शाळांच्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

उपक्रमाविषयी : महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाच्या ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर्स बनून स्वच्छता राखण्याबाबत नागरिकांची नकळत होणारी चूक दाखवून देऊ लागले. यावर्षी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आला. यात राज्यातील 64,198 शाळांमधून 59,31,410 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून समाज माध्यमांतून यासंदर्भातील 15 लाखांहून अधिक व्हीडिओ शेअर झाले आहेत.

प्रकल्प संचालक श्री. आर्या यांनी प्रास्ताविकाद्वारे उपक्रमाची माहिती दिली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here