मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक अतुल बेडेकर यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ३ : – घराघरात, मनामनांत मराठी व्यंजन संस्कृती पोहोचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समुहाचा धडाडीचा वारसदार हरपला अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्ही. पी. बेडेकर ॲण्ड सन्स या मसाले कंपनीचे संचालक ज्येष्ठ उद्योजक अतुल बेडेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, शतकोत्तर वाटचालीत बेडेकर परिवाराच्या उद्योग समूहाने मानदंड निर्माण केला आहे. त्यांनी देश आणि विदेशात मसाले, लोणचे, पापड यांच्या माध्यमातून घराघरात स्थान निर्माण केले आहे. या उद्योग समुहाच्या चौथ्या पिढीचे अतुल प्रतिनिधीत्व करत होते. त्यांनी आपल्या धडाडीने या उद्योग समहात काळानुरूप बदल घडवून घोडदौड चालू ठेवली होती. त्यांच्या निधनामुळे जुन्या – नव्या पिढ्यांच्या दरम्यानचा मार्गदर्शक दुवा निखळला आहे. त्यांच्या अकाली निधनाने झालेला आघात सहन करण्याची बेडेकर परिवाराला शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ उद्योजक अतुल बेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

00000