अतुल बेडेकर यांच्या अकाली निधनाने मराठी खाद्यपदार्थ उद्योग सातासमुद्रापार पोहोचवणारा धडाडीचा उद्योजक हरपला –  मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई,  दि.3  :- व्हि. पी. बेडेकर अँड सन्स या आघाडीच्या लोणची मसाले उद्योगाचे संचालक अतुल बेडेकर यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. मराठी पारंपरिक खाद्यपदार्थ सातासमुद्रापार पोहोचवणारा पुढच्या पिढीतील एक धडाडीचा उद्योजक आपण अकाली गमावला आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

पारंपरिक लोणची, मसाले व चटण्या बनविण्याच्या उद्योगात त्यांनी स्वतःची छाप उमटवली होती. अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेला बेडेकर मसाले हा ब्रँड खऱ्या अर्थाने ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्यात अतुलजीं बेडेकर यांचा मोलाचा वाटा होता. “बेडेकर” हा ब्रँड त्यांनी सातासमुद्रापार पोहोचवलाच, त्याचबरोबर फ्रोजन फूडच्या नव्या क्षेत्रात प्रवेश करत उकडीचे मोदक, मसालेभात,  बटाटेवडा यासारखे पारंपरिक अस्सल मराठी पदार्थ फ्रोजन स्वरूपात त्यांनी उपलब्ध करून दिले. त्यामुळेच हे पारंपरिक मराठी पदार्थ पंचतारांकित हॉटेल्स, एअर इंडियाची विमाने यातही उपलब्ध होऊ शकत आहेत, ही त्यांची कौतुकास्पद कामगिरी आहे.

००००