तालुक्यातील १५ गटातील ५ हजार महिलांच्या हाताला देणार काम – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 4 नोव्हेंबर 2023 (जिमाका वृत्त): आदिवासी विकास विभाग व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी महिला भगिनींना आत्मनिर्भर करण्याचा शासनाचा मानस असून, बचतगटांच्या माध्यमातून शहादा तालुक्यात केळी, पपई व कापसावरील प्रक्रिया उद्योग सुरू करून तालुक्यातील 15 गटातील 5 हजार महिलांच्या हाताला काम देणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

 ते आज शहादा येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित महिला बचत गटांच्या शेळी गट निवड पत्र वितरणाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत पावार, जि.प.च्या कृषि सभापती हेमलता शितोळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटीया, जिजाबाई ठाकरे, रजनी नाईक, धनराज पाटील, राजेश जाधव, नानाभाऊ निकम, के.डी. नाईक व महिला बचतगटांच्या प्रमुख व परिसरातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, शहादा तालुक्यात कृषिपुरक उद्योगांना मोठा वाव आहे. त्यामुळे या तालुक्यातील 15 गटातील 5 हजार महिलांना बचत गटाच्या माध्यमातून प्रशिक्षित केले जाईल. त्यातील प्रत्येक महिलेच्या हाताला काम देण्याबरोबरच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्नशील असल्याचे सांगून केळी, पपई, कापूस या कृषि उत्पादनांसाठी बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांना प्रत्साहन देण्यात येईल. आदिवासी बांधव हे अतिदुर्गम भागात झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या घरात राहतात, त्यांना हक्कांचे व कायमस्वरूपी पक्के घर मिळावे यासाठी शबरी घरकुल योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविली जाते. त्यासाठी भरीव निधी वितरीत करण्यात आला आहे. योजनेकरीता सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता मागेल त्याला घरुकुलांचे उद्दिष्ट आहे. तसेच गरजू ओबीसी बांधवांसाठी प्रधानमंत्री मोदी घरकुल योजनेच्या माध्यमातून हक्काचा निवारा दिला जाईल.

आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासह स्थलांतर आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबरोबरच योजनांचा लाभ शेवटच्या आदिवासी बांधवाला मिळावा यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असून आदिवासी समाज सक्षम होण्यासाठी शासन म्हणून नेहमीच प्रयत्नरत असल्याचे सांगताना ते म्हणाले, जिल्ह्यातील रस्त्यांसाठी भरघोस निधिंची तरतूद करण्यात आली असून भगवान बिरसा मुंडा सारख्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकही गाव, पाडा, आरोग्य केंद्र, आश्रमशाळा वंचित राहणार नाही याबाबत बचनबद्ध असल्याचेही आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

यावेळी जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, लीना बनसोड यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.

०००००