- नोंदी तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन
- नागरिकांनी त्यांच्याकडील कागदोपत्री पुरावे तालुका कक्षास सादर करावेत
सांगली, दि.4 (जि.मा.का.) :- मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यातही कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीचे काम मिशन मोडवर करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबी नोंदी युद्धपातळीवर तपासणीचे कार्य या कक्षामार्फत केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षातील कामकाजासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना कक्षाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार लीना खरात व संबधित कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, उपजिल्हाधिकारी अजय पवार हे या कक्षाचे नोडल अधिकारी असून कक्षासाठी आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष कक्षाकडील आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कक्षामार्फत सांगली जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबी नोंदी युद्धपातळीवर तपासून प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करण्यात येईल. प्रत्येक विभाग प्रमुख तालुकास्तरावर एक नोडल अधिकारी व त्यांच्या मदतीला आवश्यक कर्मचारी नियुक्त करून तालुका स्तरावर एक कक्ष स्थापन करण्यात येऊन सर्व अभिलेख्यांची पडताळणी करून कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीची नोंद असलेले अभिलेखे शोधण्यात येतील. अभिलेखे मोडी, कन्नड वा उर्दू भाषेत असतील तर त्याचे भाषांतर करून ते प्रमाणित करण्यात येतील.
विशेष कक्षामार्फत व प्रत्येक विभागाच्या कक्षामार्फत तालुका स्तरावरील सनियंत्रण समितीकडे व तेथून तालुकास्तरावरील तपासलेल्या अभिलेख्यांचे एकत्रीकरण करून त्याचे डीजीटायझेशन करून सर्व अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येतील. नागरिकांही त्यांच्याकडे कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीची नोंद असलेले काही कागदोपत्री पुरावे असल्यास ते त्यांनी तालुकास्तरावरील कक्षाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
तसेच, ३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील विभाग प्रमुखांची दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात येऊन उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता प्राप्त अर्जावर त्वरित निर्णय घेण्याबाबत, त्याकरिता आवश्यक ते अभिलेखे उपलब्ध करून देण्याबाबत, तसेच ‘मराठा-कुणबी’, ‘कुणबी मराठा’ प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान पद्धतीने करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
०००००