कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या अनावरण

0
7

मुंबई, दि. ६: काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण उद्या मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारदेखील उपस्थित राहणार आहे. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील घेणार आहेत.

आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मीरमधील कुपवाडा येथे बसविण्यासाठी आला आहे. २० ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई राजभवन येथून समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारुढ पुतळ्याचे ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात स्वागत करण्यात आले. तेथून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवून कुपवाडाकडे हा पुतळा मार्गस्थ करण्यात आला होता.

महाराष्ट्रातून सुरु झालेला हा प्रवास सुमारे २२०० किमी अंतर पार करीत एका आठवड्यात कुपवाडा येथे पोहोचला. रस्त्यातील महत्त्वाच्या शहरांमधील ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी या पुतळ्याचे पूजन करतानाच स्वागतही करण्यात आले. उद्या ७ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमिपूजन यंदाच्या पाडव्याच्या दिवशीच करण्यात आले. त्यासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आले होती. हा पुतळा साडेदहा फूट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ बाय ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे.

पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलीकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने असावे अशा पद्धतीने पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १८०० ट्रक माती टाकून भराव करण्यात आला. शिवाय या भागातील हवामान, भूस्खलन याबाबी पाहता पक्के बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here