नीति आयोगाच्या उपाध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट  

मुंबई, दि. 8: नीति आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रामध्ये असलेल्या पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने यामुळे औद्योगिक गुंतवणुक राज्यात वाढत असून उद्योगांना जलदगतीने परवानग्या देण्यासाठी देखील राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील विकास प्रकल्पांना नीति आयोगाच्या माध्यमातून सहकार्य असेच कायम ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक, ‘मित्राचे’ मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त वभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय यावेळी उपस्थित होते.

राज्यात मध्यम, लघु, अतिलघु उद्योगांना गती देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उद्योग वाढीसाठी चांगल्या पायाभूत सुविधा, संपर्क साधने, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता असून गुंतवणूक वाढीला चालना देण्यात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून पुढील दोन वर्षांत खड्डे मुक्त मुंबई करण्याचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील विविध प्रकल्पांना केंद्र शासनाकडून आवश्यक ते सहकार्य मिळत आहे. भविष्यात विकास कामांसाठी नीती आयोगाचे असेच सहकार्य मिळत राहो, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

००००