‘वन स्टॉप सेंटर’ योजनेच्या अंमलबजावणीची माहिती घ्यावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ८ : देशातील अन्य राज्यात ‘वन स्टॉप सेंटर’ या योजनेच्या केलेल्या अंमलबजावणीची माहिती घ्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात राज्यातील वन स्टॉप सेंटर स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री कु.तटकरे बोलत होत्या.

यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, स्वयंप्रेरणा ग्रामीण महिला संघटनेचे अध्यक्ष ॲड. शाहू काटकर (कोल्हापूर), सामाजिक आर्थिक स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, सानेगुरूजी फाऊंडेशन फॉर एज्युकेशन कल्चर ॲण्ड रुरल डेव्हलपमेंट रिसर्चचे अध्यक्ष नरेंद्र बाळू पाटील (जळगाव), सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या (अलिबाग) अध्यक्ष सुप्रिया जेधे उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, राज्यात ‘वन स्टॉप सेंटर’ चालविण्याबाबत केंद्र शासनाचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे अन्य राज्यात कशा प्रकारे अंमलबजावणी केली जाते याची माहिती घेऊन सादर करावी, या विषयावर विभागाने प्रस्ताव तयार केल्यानंतर त्यावर कार्यवाही करण्यात येईल.सामाजिक संस्थामार्फत ‘वन स्टॉप सेंटर’  सुरू होते. त्यांना मानधन अदा करण्याबाबतचाही निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे  मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

००००

संध्या गरवारे/विसंअ