मराठी भाषा विद्यापीठाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

मुंबई, दि. ८ : रिद्धपूर (जि.) अमरावती येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबतचा अहवाल सादर केला.

आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी हा अहवाल सुपूर्द केला.याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्रिमंडळातील सदस्य,मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षापासून होती. या मागणीचे महत्व लक्षात घेऊन शासनाने समितीचे गठन केले होते. समितीने दोन महिन्यांत आपला अहवाल पूर्ण केला आहे.

मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम होतील याचाही विचार करण्यात आला आहे. पारंपरिक विद्यापीठांपेक्षा मराठी भाषा विद्यापीठातून महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, वेगळेपण केंद्रस्थानी ठेऊन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करण्यात येईल, असे समितीचे अध्यक्ष डॉ. मोरे यांनी सांगितले.

000