नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई दि 8:- जिल्ह्यांच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनव्दारे समतोल विकास साधण्यासाठी महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अर्थ,उद्योग व कृषी या विषयांवर चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जिल्ह्यांचे स्ट्रॅटेजिक प्लॅन बनवण्यात येत असून राज्याच्या समतोल विकासासाठी सर्वसमावेशक विकासावर भर देण्यात येत आहे. राज्यात सर्वच क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या उभारणीवर विशेष भर देण्यात येत आहे. विविध जलसंपदा प्रकल्पही वेगाने पूर्ण होत आहेत. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येत आहे. शेती शाश्वत होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. हवामान बदलाचे दुष्परिणाम शेतीवरही जाणवतात. या समस्येला सामोरे जाण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ठिबक सिंचन वापरावर अधिक भर देण्यात येत आहे. सौर ऊर्जा वापरासाठी मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात येत असून शेतकऱ्यांनाही यामध्ये सामावून घेतल्याने शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांसाठी फलोत्पादन क्षेत्र संजीवनी ठरत असून कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात फलोत्पादन क्षेत्र विकसित आहे. अन्नप्रक्रिया उद्योगालाही चालना देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

विकासकामांना अधिक गती देण्याच्या अनुषंगाने पंचायत स्तरावर प्रशासकीय यंत्रणा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष श्री बेरी म्हणाले, देशाच्या सर्वांगीण विकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. शहरांच्या विकासासह विविध क्षेत्रात महाराष्ट्राची कामगिरी उत्कृष्ट आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन सिद्ध होत आहे. निती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र इन्स्टिटय़ूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र)’ या संस्थेचे कामही उत्कृष्ट असल्याचे गौरवोद्गार श्री. बेरी यांनी काढले.

 

—–000——