‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत ‘सेल्फी विथ मेरी माटी’चे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र महाराष्ट्राला प्रदान
मुंबई, दि. 9 – ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि शहीद आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुबीयांप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या अभियानाच भाग म्हणून महाराष्ट्रात ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये झाली आहे. ही बाब अभिमानाची असल्याचे सांगून राज्यपाल रमेश बैस यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
मुंबई विद्यापीठाच्या कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधान सभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, गिनीज बुक रेकॉर्ड भारतातील प्रतिनिधी ऋषिनाथ ॲड्ज्युरिकेटर उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये ४० विद्यापीठातील ७ हजार महाविद्यालयातील २५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्यास प्रोत्साहित करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अभिनंदन करून २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल यांनी युवकांना केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या नव्या आवृत्तीचे, ई-बुक आणि ऑडिओ बुकचे यावेळी प्रकाशन झाले याचा आनंद आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात, नाटक, कथा, कादंबरी, लोककथा, प्रवासवर्णन आदी लेखन केले. त्यांच्या साहित्याचे भारतीय आणि विदेशी भाषेत सुद्धा अनुवाद झाले आहे. त्यांचे साहित्य पुनर्मुद्रीत करून ई-बुक तयार केल्याबद्दल राज्यपालांनी समितीचे अभिनंदन केले. लोकशाहिरांचे साहित्य वाचण्याचे आणि देशातील लोकांची सेवा करण्याचे आवाहन राज्यपालांनी युवकांना केले.
‘सेल्फी विथ, मेरी माटी’ अभियानाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद ही महाराष्ट्राला दिवाळी भेट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विक्रमविरांची परंपरा महाराष्ट्राला आणि इथल्या मातीला लाभली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान देशभरात राबविण्यात आले. याचाच भाग म्हणून ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणे ही दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राला मिळालेली भेट आहे. देश प्रेमाच्या या भावनेतून हा उपक्रम यशस्वी करून वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला जी 20 चे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला, ही अभिमानाची बाब आहे, असेही त्यांनी सांगितले.
चीनचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र समोर आला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारत हा केवळ भूभाग नसून आपण आपल्या देशाला मातेचे स्थान दिले आहे. ज्याप्रमाणे मातेचे उत्तरदायी होता येत नाही, तसे मातीचे सुद्धा उत्तरदायी होता येत नाही आणि ऋण ही फेडता येत नाही, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. या अभियानातून देशात मातीची मोठ्या प्रमाणावर पूजा केली. या मातीने आपल्याला स्वातंत्र्यसेनानी दिले. या देशाबद्दल प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात आपल्या मातीबद्दल देशभावनेचे अभियान राबविण्यात आले आणि चीनचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र समोर आला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे प्रकाशन आज होत आहे. मी जेव्हा रशियाच्या विद्यापीठात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते, तेव्हा विद्यापीठात साहित्याबद्दलचे प्रेम, उत्कंठा, अभ्यास, बघितल्यावर अभिमान वाटला. देशातले एक सुपुत्र साहित्याने रशियाला ही भुरळ पाडली. त्यांच्या साहित्याच्या प्रकाशनासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे अभिनंदनही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले.
अभियानात सहभागीय विद्यार्थ्यांचे अभिनंदन – चंद्रकांत पाटील
25 लाख विद्यार्थ्यांनी ‘सेल्फी विथ मेरी माटी’ या उपक्रमात सहभाग घेतला. हे देशभक्तीचे उत्तम उदाहरण असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. गेल्या एक ते दीड महिन्यापासून राज्यातील सर्व विद्यापीठे महाविद्यालये, उच्च शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व इतर सर्व संबंधितांनी ‘सेल्फी विथ मेरी माटी’ अभियान यशस्वीपणे राबवून विश्वविक्रम केला आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
०००
काशीबाई थोरात/विसंअ, श्रद्धा मेश्राम,स.सं