मिरजच्या महिला व नवजात शिशु रूग्णालयाची प्रशासकीय प्रक्रिया यंत्रणांनी वेगाने पूर्ण करावी – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगलीदि. 10 ( जि.मा.का.) : मिरज येथील १०० खाटांच्या महिला व नवजात शिशु रूग्णालय उभारणीबाबतची प्रशासकीय प्रक्रिया संबंधित यंत्रणांनी दोन महिन्यात पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.

या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपायुक्त स्मृती पाटील, नगर भूमापन अधिकारी ज्योती पाटील, तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे व अनंत गुरव आदि उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जनतेच्या आरोग्यासाठी मिरज येथे या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मिरज येथे १०० खाटांच्या महिला व नवजात शिशु रूग्णालयाच्या अंदाजपत्रक व आराखड्यास शासन स्तरावर मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी ४६ कोटी ७३ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. तरी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम, भूमिअभिलेख विभागांनी सकारात्मक भूमिका ठेवत परस्पर समन्वयाने याबाबतची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी. हॉस्पिटलच्या जागेसंदर्भातील अडथळे दूर करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

00000