राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन

0
11

नागपूर दि.16: कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन कर प्रणालीत अधिक सुलभता तसेच पारदर्शकता आणल्यास करदात्यांमध्ये विश्वास निर्माण होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

येथील राष्ट्रीय कर अकादमीत भारतीय राजस्व सेवेच्या  ७७ व्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना राज्यपाल श्री.बैस बोलत होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रशासकीय सदस्य रवी अग्रवाल, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रधान महासंचालक जयंत दिद्दी, अपर महानिदेशक मनिष कुमार, अपर महानिदेशक सिद्दरमप्पा कपत्तनवार यावेळी उपस्थित होते.

जग अत्यंत जवळ येत असून येत्या काळात कर संकलन प्रणाली जागतिक स्तरावरुन संचलित व्हावी याचा विचार होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करून राज्यपाल म्हणाले, भावी अधिकाऱ्यांना उत्कृष्ट प्रशासक म्हणून घडविणारे हे प्रशिक्षण या तुकडीला परिपूर्ण करेल. असे प्रशिक्षण अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीचा महत्वाचा टप्पा असून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यात राष्ट्रीय कर अकादमी महत्वाची भूमिका पार पाडेल.  करदात्यांसोबत योग्य व्यवहार करुन करसंकलन करणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य असेल. आपले कर्तव्य बजावताना आदर्श परिमाणांसोबत तडजोड न  करता नैतिकता व सदाचाराचे पालन करुन या पदाला योग्य न्याय द्यावा, असे आवाहनही त्यांनी  केले.

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी डेटा संकलन ही महत्वाची जबाबदारी राजस्व विभागावर असणार आहे, यासाठी  या विभागाला पारदर्शी भूमिका पार पाडावी लागणार आहे. राष्ट्रीय कर अकादमीने आपली गौरवशाली परंपरेची जोपासना करुन अधिकाधिक  प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले आहे.  भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करित असतांना यावर्षी ७७ वी तुकडी प्रशिक्षित होत आहे हे अभिमानास्पद आहे.  २०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प आपण पुर्णत्वास नेणार आहोत, असा आशावादही  राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी व्यक्त केला.

अकादमीमध्ये स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे ही प्रणाली जगात सर्वोत्कृष्ट असून सर्व आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे यामुळे शक्य झाले असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य रवी अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.

प्रदीप एस यांनी ७७ व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थीचे प्रोफाईल वाचन केले. प्रधान महासंचालक जयंत दिद्दी यांनी प्रास्ताविक केले तर श्रीमती हर्षवाणी सिंग यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here