‘बाल स्नेही’ पुरस्कारांचे २२ नोव्हेंबर रोजी होणार वितरण – राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा

मुंबई, दि.२० : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ, कम्युटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT), होप फोर चिल्ड्रन इंडिया, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘बाल स्नेही’ पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

हा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉइंट, मुंबई येथे सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या कालावधीत होणार आहे. या कार्यक्रमास माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे उपस्थित राहणार आहेत.

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग हा राज्यस्तरीय बाल हक्क संरक्षण अधिनियमान्वये स्थापित आयोग आहे. बाल हक्काच्या संरक्षणाची जपणूक, प्रचार व प्रसार हा आयोगाचा उद्देश आहे. राज्यात बालकांचा सर्वांगीण विकास, बाल हक्क संरक्षण, त्यांची सुरक्षा, आरोग्य इ. अनेक महत्त्वपूर्ण विषयावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बाल संरक्षण कक्ष, विशेष बाल पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, बालगृह, बाल कल्याण समिती इ. प्रशासकीय यंत्रणा व संस्था या सकारात्मक पद्धतीने मोलाचे कार्य पार पाडत आहेत, अशा व्यक्ती व संस्थांना “बाल स्नेही” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

राज्यात अशाप्रकारे बालकांसाठी काम करणाऱ्या सर्व यंत्रणांकरिता बालस्नेही पुरस्कार सोहळ्याचे प्रथमच आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये राज्यातील विविध बालगृहांमध्ये वास्तव्य करून शिक्षण घेतलेले व सद्य:स्थितीत विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या एकूण ७५ तरुण – तरुणींचा सत्कार करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेला राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (ठाणे) महेंद्र गायकवाड, मुंबई शहरचे बी. एच. नागरगोजे उपस्थित होते.

००००

संध्या गरवारे/विसंअ/