जालना, दि. 30 (जिमाका) :- जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे द्राक्ष, मोसंबी, डाळींब या फळपिकांसह कापूस, ज्वारी, हरबरा यासह इतरही पिकांचे मेाठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे तात्काळ सरसकट पंचनामे करुन अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री अतुल म्हणाले की, अवेळी झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युध्दपातळीवर सरसकट सर्वच शेतपिकांचे पंचनामे करुन अहवाल सादर करावा. अधिवेशनापुर्वीच यावर निर्णय घेण्याचा प्रयत्न करु. शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे वेळेवर मिळण्यासाठी कृषी विभागाने प्रलंबित ई-केवायसीचे कामही जलदगतीने पूर्ण करुन घ्यावे. पिक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानीचे वेळेवर पैसे मिळणेही अत्यंत गरजेचे असून मागील वर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या प्रलंबित पिक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्याची कार्यवाही करावी. तसेच पिक विमाची प्रक्रीया करताना काही त्रुटी आढळल्यास त्या दूर कराव्यात. तसेच मागील वर्षीचे अतिवृष्टीमुळे प्रलंबित पिक नुकसानीचे पैसेही शेतकऱ्यांना अदा करावेत.
प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरणाव्दारे जिल्हयातील अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतची माहिती दिली.
-*-*-*-*-*-